vk

धमाकेदार सेंच्युरीनंतरही सूर्या मागेच राहिला, शेवटी न खेळता विराट कोहलीच ठरला किंग…

क्रीडा

भारतीय 360 फलंदाज म्हणून ओळख निर्माण केलेल्या सूर्यकुमार यादव टी-20 क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यापासून धावांची बरसात करत आहे. क्रिकेटच्या सर्वात छोट्या फॉर्मेटमध्ये त्याने यंदाच्या वर्षात मोठी कामगिरी करुन दाखवली आहे.

दरम्यान, सूर्याने एका कॅलेंडर वर्षांत तब्बल 170 पेक्षा अधिक स्ट्राइक रेटनं त्याने 1500 पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. यात आंतरराष्ट्रीय सामन्यासह आयपीएलमधील कामगिरीचाही समावेश आहे. याशिवाय, न्यूझीलंड विरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेत त्याला वर्ल्ड रेकॉर्डची संधी होती. त्याने एका सामन्यात दमदार शतकही झळकावले.

पण पहिला सामना आणि अखेरचा सामना पावसाने वाया गेला. परिणामी तो मोहम्मद रिझवानच्या रेकॉर्डपासून दूरच राहिला. न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेनंतर सूर्याच्या खात्यात 1164 धावांची नोंद झाली आहे. तो 162 धावांनी मागे पडला. याशिवाय, आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटच्या कॅलेंडर ईयरमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड पाकिस्तानचा सलामीवीर मोहम्मद रिझवानच्या नावे आहे.

त्याने 2021 या वर्षात धावांची बरसात करत 29 टी-20 सामन्यात 1326 धावा केल्या आहेत. तसेच सूर्यकुमार यादवने 2022 वर्षात सर्वाधिक धावा करण्याचा पराक्रम करुन दाखवला आहे. त्याच्या खात्यात 1503 धावांची नोंद आहे. 2022 या वर्षात सूर्याने सर्वाधिक धावा केल्या असल्या तरी भारतीय खेळाडूंच्या ऑल ओव्हर यादीत तो दुसऱ्या स्थानावर आहे.

एका कॅलेंडर ईयरमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम भारताकडून विराट कोहलीच्या नावे आहे. कोहलीने 2016 मध्ये 89.66 च्या सरासरीसह 147.12 च्या स्ट्राइक रेटनं 29 डावात 1641 धावा केल्या होत्या. या वर्षी कोहलीने आयपीएलमध्ये 4 शतकासह 973 धावा ठोकल्या होत्या. सूर्यकुमार यादवने 2022 मध्ये 41 टी20 डावात 175.99 च्या स्ट्राइक रेटसह 45.54 च्या सरासरीने 1503 धावा केल्या आहेत.

यामध्ये 2 शतकासह 12 अर्धशतकांचा समावेश आहे. एका कॅलेंडर ईयरमध्या भारताकडून सर्वाधिक धावा कऱण्याचा विक्रम हा कोहलीच्या नावेच आहे. यंदाच्यावर्षात टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत सूर्यकुमार यादव पाचव्या स्थानावर आहे. पाकिस्तानचा सलामीवीर मोहम्मद रिझवान याने 1817 धावा केल्या आहेत.

त्याच्यापाठोपाठ ऐलेक्स हेल्स, शान मसूद आणि जोस बटलर यांचा नंबर लागतो. न्यूझीलंड दौऱ्यातील तीन सामन्यांची टी-20 मालिकेनंतर भारतीय संघ आता उर्वरित दोन महिन्यात एकही टी-20 सामना खेळणार नाही. त्यामुळे आता रिझवान किंवा विराट कोहलीचा विक्रम मागे टाकणे सूर्यकुमारला यंदाच्या कॅलेंडर ईयरम्ध्ये तरी शक्य नाही.

आता नव्या वर्षात सूर्याला पुन्हा नव्याने सुरुवात करावी लागेल. या वर्षांत त्याला रिझवान आणि कोहलीला मागे टाकायला जमलं नसलं तरी टी-20 रँकींगमध्ये त्याने अव्वलस्थानी कब्जा करण्यात यश मिळवले.

आगामी टी-20 सामन्यात तो सातत्य कायम राखण्यासाठी प्रयत्नशील असेल. याशिवाय पुढच्या काळात आता टीम इंडिया वनडेवर फोकस करेल, यातही त्याची कामगिरी महत्त्वाची ठरेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *