वसंत मोरेंनी मनसेच्या इंजिनाची नुकतीच साथ सोडली आहे. मग त्यांनतर तात्यांना राज्यातील अनेक मोठ्या नेत्यांची पक्षप्रवेशाची ऑफर येत आहे. दरम्यान, त्यांनी नुकतीच शरद पवारांची भेट घेतली, मात्र शरद पवारांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश होता होता राहिला, असे सर्वत्र सांगितले जात आहे. वसंत मोरे पक्षप्रवेश न करताच माघारी का परतले? जाणून घ्या..
दरम्यान, येत्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील राजकारणाला प्रचंड वेग आला असून 2 दिवसांपूर्वीच मनसेचे फायरब्रँड नेते म्हणून ओळखले जाणारे वसंत मोरे यांनी पक्षा सोडला. मग त्यानंतर वसंत मोरे कोणत्या पक्षात प्रवेश करणार? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. याच पार्श्वभूमीवर वसंत मोरे यांनी गुरुवारी पुण्यात शरद पवार यांची भेट घेतली होती.
दरम्यान, ते शरद पवार गटाच्या कार्यालयात पोहोचल्याने सुरुवातीला वसंत मोरे पक्षप्रवेश करतील असे जवळजवळ फिक्स मानले जात होते. परंतु, शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर वसंत मोरे पक्षप्रवेश न करताच माघारी परतल्यानंतर त्यांच्या या कृतीने अनेकजण बुचकाळ्यात पाडले आहे. त्यामुळे वसंत मोरे यांच्या डोक्यात कोणता प्लॅन घोळत आहे? अशी चर्चा आता सर्वत्र रंगत आहे.
दरम्यान, वसंत मोरे यांनी बुधवारीच आपल्याला सर्व पक्षाच्या नेत्यांकडून फोन आल्याचे सांगितले होते. तसेच यामध्ये संजय राऊत आणि मुरलीधर मोहोळ, मोहन जोशी यांचा समावेश होता. परंतु, आज वसंत मोरे हे शरद पवारांना भेटण्यासाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कार्यालयात पोहोचल्याने ते पक्षप्रवेश करणार अशी खात्री अनेकांना पटली असतांना ऐन वेळी वसंत मोरे कार्यालयातून बाहेर पडले.
यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हटले की, मी या ठिकाणी पक्षप्रवेशासाठी आलेलो नाही. मला सुप्रियाताईं सुळेनी आज भेटीसाठी वेळ दिली होती, त्यामुळे मी आज या ठिकाणी आलो होतो. मात्र मी काँग्रेसच्या मोहन जोशी यांच्याशी चर्चा केली असून शिवसेना नेत्यांशीही माझे बोलणे झाले आहे. दरम्यान, पुण्यात एक वेगळा प्रयोग करु शकतो.
कसब्याची पुनरावृत्ती करायची असेल, तर त्यासाठी पुणे लोकसभेचा उमेदवार वसंत मोरे कशाप्रकारे असू शकतो? हे पवार साहेबांना सांगायला आलो होतो. मी पुणे लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक असून हे मी शरद पवारांना देखील सांगितले आहे. कारण ते महाविकास आघाडीतील मोठे नेते आहेत. त्यामुळे ते ही गोष्ट समजू शकतात. दरम्यान, मविआतील इतर नेत्यांनाही ते ही गोष्ट समजवू शकतात. त्यामुळे मला माझी भूमिका स्पष्ट करण्यासाठी आणखी 2 दिवस लागतील, असे वसंत मोरे यांनी सांगितले.