काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने रस्त्यावरील अपघातावर नियंत्रण ठेवण्यासाठी नवा कायदा आणला असून त्यात वाहनचालकांकडून जर अपघात झाला तर त्या अपघाताबद्दल चालकाला किमान 10 वर्षे शिक्षा तसेच तब्बल 7 लाख रुपये दंड अशी तरतुद केल्याचे सांगण्यात येते. या कायद्याच्या विरोधात भारतातील पेट्रोल पुरवठा करणाऱ्या इंडियन ऑइल, एचपीसी एल, बीबीसीएल या तिन्ही कंपन्यांच्या टँकर चालकांनी संप पुकारला आहे.
त्यामुळे, राज्यातील अनेक जिल्ह्यात टँकर व ट्रक एकाच जागी बसून असल्याचे दिसून येत आहे. मात्र, या घटनेचे पडसाद थेट पेट्रोलपंप चालकांवर होत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. त्यातच, राज्यभरात पुढील 2-3 दिवस पेट्रोल पंप बंद राहणार अशी अफवा सर्वत्र पसरली आणि लगेच लोकांनी आपल्या जवळीक पेट्रोल पंपवर गर्दी करण्यास सुरवात केली. मात्र, पेट्रोल पंप बंद राहणार नसल्याचं पेट्रोल-डिझेल असोसिएशसने स्पष्ट केले आहे.
टँकर चालकांच्या संपाला प्रतिसाद देण्यासाठी अनेक ठिकाणी पेट्रोल पंपावरुन टँकर बाहेर पडले नाहीत. तर, काही ठिकाणी पेट्रोलच्या टँकरचा पुरवठा झाला नाही. त्यामुळे, आज 2 जानेवारी पेट्रोल पंप बंद राहणार असल्याची अफवा सर्वत्र पसरली. मग लगेच या अफवेतून राज्यातील बहुतांश पेट्रोल पंपांवर नागरिकांनी पेट्रोल भरायला गर्दी केली. तर, पेट्रोल दर कमी होणार असल्याच्या अफवेनेही काही ठिकाणी पेट्रोल पंपावर गर्दी झाली. मात्र, पेट्रोल-डिझेल असोसिशनं प्रेसनोट काढून स्पष्टीकरण दिलं आहे. संपाचा किंवा पेट्रोल पंप बंद ठेवण्याची संघटनेची कुठलीही योजना नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
दरम्यान, पुण्यातील पेट्रोल-डिझेल असोसिएशननं यासंदर्भात एक पत्रक प्रसिद्ध केलं त्यानुसार त्यामध्ये यासंदर्भात स्पष्टीकरण देण्यात आले आहे. यामध्ये म्हटलं की, सर्वसामान्य जनतेला त्यांनी विनंती केली आहे की, नागरिकांनी कोणत्याही अफवांमुळं किंवा बातम्यांमुळं घाबरून जावू नये. तसेच जिल्ह्यात पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी संघठना बांधिल आहे, असं पेट्रोल-डिझेल असोसिएशनचे अध्यक्ष ध्रुव रुपारेल यांनी स्पष्ट केलं.
दरम्यान, नागरिकांनी मात्र पेट्रोल चालकांच्या संपामुळे पेट्रोलची टंचाई निर्माण होण्याच्या भितीमुळे 2 जानेवारीच्या दुपारपासूनच पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी गर्दी करण्यास सुरुवात केली. त्यामुळे पुण्यासह जवळपास सर्वच ठिकाणी पेट्रोल पंपांवर वाहनांचा लांबच लांब रांगा लागलेल्या दिसून आल्या. तसेच ऑल इंडिया पेट्रोल डिलर्स असोसिएशनचे प्रवक्ते अली दारुवाला यांनी सांगितले की, लोणी काळभोर येथील केंद्रातून पेट्रोलचे टँकर बाहेर पडण्यास सुरुवात झाली असून मंगळवारी पुणे शहर, पिंपरी चिंचवड व जिल्ह्यातील पेट्रोल पंप सुरु राहणार आहेत. कोठेही पेट्रोलची टंचाई नाही. नागरिकांनी घाबरुन जाऊ नये, अकारण जादा पेट्रोल भरुन घेऊ नये.