पुणे शहरातील कोथरूड भागातील कुख्यात गुंड शरद मोहोळ हत्या प्रकरणाने पुणं शहर चांगलेच हादरलं आहे. दरम्यान आता या प्रकरणी रोज नवे खुलासे होतांना दिसत आहे. आता या प्रकरणात मोठे अपडेट्स समोर आले असून या हत्या प्रकरणी पुणे पोलिसांनी आणखी 3 आरोपींना अटक केल्याचे सांगितले जात आहे त्यामुळे आता एकूण आरोपींची संख्या 13 वर गेली आहे.
पुणे शहरातील कुख्यात गुंड शरद मोहोळ हत्या प्रकरणी आज पुणे पोलिसांच्या गुप्तहेराकडून मोठी माहिती समोर आली असून त्यामुळे या हत्याप्रकरणी पुणे पोलिसांकडून आणखी 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा पथकाकडून काल रात्री 3 आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या. आदित्य गोळे, नितीन खैरे या दोघांसह आणखीन एका आरोपीला मोहोळ हत्या प्रकरणात अटक करण्यात आल्याचे सांगितले जाते.
दरम्यान नितीन आणि आदित्य या 2 आरोपींनी शरद मोहोळ हत्याप्रकरणीत मुख्य आरोपीला पैसे पुरवल्याची धक्कादायक माहिती समोर आली असून एवढंच नव्हे तर शरद मोहोळ हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी मुन्ना पोळेकर हा गोळीबाराचा सराव करताना हे तीनही आरोपी घटनास्थळावर उपस्थित असल्याचे सांगितले जात आहे. तसेच काल पकडण्यात आलेले तीनही आरोपी शरद मोहोळ हत्या प्रकरणात सहभागी होते.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी शुक्रवार,5 जानेवारीला कुख्यात गुंड शरद मोहोळ याची त्याच्याच कोथरूडच्या घराजवळ गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. त्यामध्ये 2 वकिलांसह 8 जणांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर आणखी आरोपींना ताब्यात घेण्यात आलं. तसेच याप्रकरणी पोलिस कसून तपास करत आहेत. त्याच दरम्यान पुणे पोलिसांनी आता आणखी 3 जणांना अटक केली आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा पथकाने काल आणखी तिघांना ताब्यात घेतल्याचे दिसून आले आहे.
कुख्यात शरद मोहोळ हत्या प्रकरणात 2 वकिलांनाही अटक करण्यात आली होती. या हत्या प्रकरणात ज्या आरोपींना अटक करण्यात आली आहे, त्यांची या वकिलांसोबत आधीच “मीटिंग” झाली असल्याचे सांगितले जाते तसेच हत्येचा हा कट बऱ्याच काळापासून शिजत होता. तसेच पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी 5 जानेवारीला शरद मोहोळच्या लग्नाच्या वाढदिवशीच त्यांची हत्या करण्यात आली. पण तो काही त्याच्या हत्येचा पहिलाच प्रयत्न नव्हता असेही सांगितले जाते. यापूर्वीही आरोपींनी 2 ते 3 वेळा शरद मोहोळ याला एकटं पाडून मारण्याचा प्रयत्न केला होता.