भारतीय नारीला शिक्षणाची ओळख झाल्यानंतर तीने प्रत्येक क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतली आहे. शिक्षणाच्या जोरावर ती भारतीय पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून लढू लागली. मात्र काही अशा ही स्रिया या भारतात आहेत, ज्यांना शिक्षणाचा गंध ही नसताना त्यांनी आपल्यामध्ये असलेल्या कलेला वाव देऊन किंवा स्वतःची वेगळी ओळख निर्माण करून स्वतःचे व कटुंबाचे नाव उज्वल केले. उदा. बहिणाबाई चौधरी या निरक्षर होत्या. मात्र आजही त्यांच्या कविता हृदयाला चटका लावून जातात. असंच एक नाव काही महिन्यांपूर्वी संपूर्ण महाराष्ट्राला, देशाला व जगाला परिचित झाले. ते म्हणजे बीजमाता राहीबाई पोपेरे.
अहमदनगर जिल्ह्यातील कोंभाळने या आदिवासी असलेल्या अत्यंत साध्या खेड्या गावातील निरक्षर महिला शेतकरी आहेत. त्यांचे नाव देशाला परिचित होण्याचे कारण म्हणजे त्यांनी मागील कित्येक वर्षांपासून देशी बियाणांचा साठा करून ठेवला आहे. आपण त्याला ‘देशी बियानांची बँक’ असे म्हणतो.त्यांच्या या ‘देशी बियाण्यांच्या बॅंकेत’ आज 52 पिकांचे 114 वाण आहेत.
राहीबाई पोपेरे या आदिवासी भागातील असल्याने त्यांना लहानपणापासून वेगवेगळे झाडे, फुले, बिया गोळा करण्याचा छंद होता. त्यांनी पुढेही जोपासला. त्यांना आढळणाऱ्या प्रत्येक झाडाचं, फुलांचं, रोपाच बी त्यांनी साठवून ठेवलं. आज अनेक प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. अशा वेळी त्यांच्याकडे खूप जुनी बीज मिळतात, हेच त्यांचे वैशिष्ट्य आहे.
कोणत्याही नावाजलेल्या कंपनीकडे उपलब्ध नसलेली बियाणे आपल्याला राहीबाई पोपेरे यांच्याकडे मिळतील. म्हणून त्यांना बीजमाता असे म्हटले जात असावे. राहीबाई यांच्याकडे सर्व प्रकारच्या जुन्या गावठी पालेभाज्या व वेलवर्गीय भाज्यांचे बियाणे जतन केलेले आहे. त्यांच्याकडे फक्त वालाचेच वीस प्रकार उपलब्ध आहेत. त्यांनी तीन हजार स्त्रीया व शेतकरी यांचा बचतगट बनवलाय. आज ही त्या त्यावर नवनवीन उपक्रम राबवितात. त्यांचे प्रोजेक्ट पाहण्यासाठी देशभरातील विध्यार्थी त्यांच्याकडे येत असतात.
एका वृत्तपत्रात राहीबाई पोपेरे यांच्याकडे असलेल्या बियाणाबद्दल बातमी छापून आल्यानंतर राज्य शासनाने त्याची दखल घेतली. आज त्या संपूर्ण देशाला परिचित आहेत. यापूर्वी त्यांनाही कधी वाटले नसेल की, आपला छंद आपल्याला इतक्या उंचावर नेऊन ठेवेल. त्यांना भारत सरकारने पद्मश्री या पुरस्काराने सन्मानित केले आहे. तसेच बीबीसीने शंभर प्रतिभावंत महिलांच्या यादीत त्यांचा समावेश केला आहे. अशा या बीजमातेने जुन्या बियाणांची साठवणूक करून देशाला संदेश दिला आहे की, आधुनिक भारताकडे झेप घेत असताना आपण ‘जून ते सोनं’ या म्हणीप्रमाणे त्याचीही जपवणूक केली पाहिजे.