आरोपींनी अलेक्झांड्रिन पोपट कोठून आणले होते आणि या अवैध धंद्यात आणखी काही लोक सामील आहेत का?, याचा तपास वन अधिकारी करत आहेत. स्थानिक पातळीवर “पहाडी पोपट” या नावाने ओळखल्या जाणाऱ्या अलेक्झांड्रिन पोपटांची विक्री केल्याप्रकरणी राज्याच्या वन विभागाने रविवारी 3 जणांना अटक केली.
गुप्त माहितीवरून, परिक्षेत्र वन अधिकारी प्रदिप संकपाळ यांच्या नेतृत्वाखालील पथकाने कोथरूड परिसरातील लोहिया IT पार्कजवळ 2 अलेक्झांड्रिन पोपट विकण्याच्या प्रयत्नात असताना तिघांना पकडले. दरम्यान, पियुष पासलकर (21), यश कानगुडे (21), सौरव ढोरे (19, सर्व रहिवासी कर्वे नगर परिसरात) अशी आरोपींची ओळख वनविभागाने केली आहे.
त्यांच्याविरुद्ध वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, 1972 च्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. उप वनसंरक्षक महादेव मोहिते यांनी कारवाईला दुजोरा दिला. आरोपींनी अलेक्झांड्रिन पोपट कोठून आणले होते आणि या अवैध धंद्यात आणखी काही लोक सामील आहेत का?, याचा तपास वन अधिकारी करत आहेत.
या कारवाईत भाग घेणारे मानद वन्यजीव वॉर्डन रोहन भाटे म्हणाले, अलेक्झांड्रीन पोपट ही पक्ष्यांची एक प्रजाती आहे जी वन्यजीव (संरक्षण) कायद्यांतर्गत संरक्षित आहे. “अलेक्झांड्रिन पोपट बाळगणे, विकणे किंवा त्यांची शिकार करणे बेकायदेशीर आहे,” असेही ते यावेळी म्हणाले.
दरम्यान, मे 2022 मध्ये पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने अलेक्झांड्रिन पोपट विकल्याच्या आरोपाखाली गणेश पेठेतून रहेमतुल्ला शौकतुल्ला खान याला अटक केली होती. त्यानंतर वनविभागाच्या पथकाच्या मदतीने पोलिसांनी कारवाईदरम्यान तीन पोपटांसह अन्य 120 पक्ष्यांना ताब्यात घेतले होते.