भारतात सध्या देशांतर्गत क्रिकेट सामने सुरू आहेत. विजय हजारे ट्रॉफीत आज तामिळनाडू आणि अरुणाचल प्रदेश यांच्यात लढत झाली. प्रत्येकी 50 षटकाच्या या सामन्यात तामिळनाडूने अरुणाचलचा 435 धावांनी पराभव केला. लिस्ट ए क्रिकेटमध्ये हा एक वर्ल्ड रेकॉर्ड ठरला आहे. याआधी लिस्ट ए मधील सर्वात मोठा विजय
सोमरसॅच संघाच्या नावावर होता, त्यांनी 346 धावांनी विजय मिळवला होता. दरम्यान, अनेक विक्रमांची नोंद झालेल्या या सामन्यात अरुणाचल प्रदेशने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. तामिळनाडूकडून एन जगदीशन आणि साई सुदर्शन यांनी विक्रमी भागिदारी करून आजवरची मोठी धावसंख्या उभी केली. तामिळनाडूचे सलामीवीर जगदीशन आणि सुदर्शन यांनी पहिल्या विकेटसाठी 416 धावांची विक्रमी भागिदारी केली.
सुदर्शनने 102 चेंडूत 2 षटकार आणि 19 चौकारांसह 156 धावा केल्या. तर जगदीशनने 141 चेंडूत 15 षटकार आणि 25 चौकारांसह 277 धावांची विक्रमी खेळी केली. 50 षटकात तामिळनाडूने 506 धावांचा डोंगर उभा केला. मग विजयासाठी मोठ्या आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या अरुणाचल प्रदेशचा डाव 28व्या षटकात फक्त 71 धावांवर संपुष्ठात आला. अरुणाचल प्रदेशच्या एकाही फलंदाजाला 20च्या पुढे धावसंख्या करता आली नाही.
तामिळनाडूकडून मनिमरन सिद्धार्थने सर्वाधिक 5 विकेट घेतल्या. अरुणाचलविरुद्ध जगदीशन आणि सुदर्शन यांनी लिस्ट एच्या इतिहासातील सर्वात मोठी भागिदारी केली. या दोघांनी वेस्ट इंडिजच्या क्रिस गेल आणि मार्लेन सॅम्यूल्स यांचा 372 धावांचा विक्रम मागे टाकला. विजय हजारे ट्रॉफीमध्ये फलंदाज नारायण जगदीशन याने धमाकेदार फलंदाजी करत सर्वांचीच मने जिंकली आहेत. या धडाकेबाज फलंदाजाने बीसीसीआयचे सचिव जय शहा यांच्यावरही गारूड केले आहे.नारायण जगदीशने 277 धावांची विक्रमी खेळी खेळून सर्वांचेच लक्ष आपल्याकडे वेधले आहे.
तुफानी फलंदाजी करणाऱ्या या फलंदाजाचे बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी खास अभिनंदन केले आहे. जय शहा यांनी केले जगदीशनचे खास अभिनंदन एन जगदीशन यांच्यासंदर्भात जय शहा यांनी ट्विट करत हे खास अभिनंदन केले आहे.
जय शहा आपल्या ट्विटमध्ये लिहितात ‘सलग 5 शतके झळकावणारा पहिला क्रिकेटपटू बनल्याबद्दल आणि लिस्ट-ए क्रिकेटमध्ये सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्येचा जागतिक विक्रम मोडल्याबद्दल जगदीसनचे अभिनंदन. तुझ्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.’ विजय हजारे ट्रॉफी 2022 अंतर्गत अरुणाचल प्रदेश आणि तामिळनाडूच्या संघांमध्ये सामना रंगला.
या सामन्यात सलामीवीर एन. जगदीसनने 141 चेंडूत 25 चौकार आणि 15 षटकारांसह 277 धावांची विक्रमी खेळी खेळली. लिस्ट ए मधील कोणत्याही फलंदाजाची ही सर्वोच्च धावसंख्या आहे. त्यामुळे तामिळनाडूने 435 धावांनी विक्रमी विजय नोंदवला. लिस्ट ए क्रिकेटमधील हा सर्वात मोठा विजयाचा विक्रम आहे.