राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्याचे अर्थमंत्री म्हणून जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत पुणे विभागातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या 5 जिल्ह्यांची राज्यस्तरावरील आढावा बैठक नुकतीच पुण्यात घेतल्याचे दिसून आले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पुण्यात मोठी ताकद असून सन 2014 ते 2019 ही 5 वर्षे आणि महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर सत्तेत सहभागी होईपर्यंतचा काही काळ हा अपवाद वगळता गेली अनेक वर्षे अजित पवार हेच पुण्याचे पालकमंत्री असल्याचे दिसून येते. त्यामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त तसेच जिल्हा परिषद सीईओ, पोलीस आयुक्त किंवा जिल्हाधिकारी या पदांवर चमकदार कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांकडे सुध्दा सुत्रे देण्याकडे पवार यांचा कल असल्याने बोलले जात आहे.
यापूर्वी सन 2014 मध्ये नागपूर जिल्हाधिकारी म्हणून चांगले काम केल्यानंतर अजित पवारांनी सौरभ राव यांना पुण्याचे जिल्हाधिकारी म्हणून आणले होते. सौरभ राव यांनी जलयुक्त शिवारमध्ये चांगले काम असून त्यांनी दरड कोसळलेल्या माळीण गावचे पुनर्वसन, तसेच पालखी मार्गांचे विस्तारीकरण आणि मतदारयाद्यांची दुरुस्ती ही महत्त्वाची कामे त्यांनी प्रभावीपणे मार्गी लावली असल्याचे सांगितले जाते.
याशिवाय, अकोला मधील जिल्हा परिषदेचे सीईओ आयुष प्रसाद यांना देखील अजित पवार यांनीच पुण्यात सीईओ म्हणून आणले होते. त्यांनी देखील सीईओ म्हणून चांगले काम केले होते. तसंच आताही एक जिल्हाअधिकाऱ्याची प्रशासनात चांगलीच चर्चा रंगत असल्याचे दिसून येत आहे. जितेंद्र डुडी हे याअधिकाऱ्याचे नाव असल्याचे सांगितले जाते.
दरम्यान, या बैठकीत साताऱ्याचे जिल्हाधिकारी असलेल्या जितेंद्र डुडी यांनी सादरीकरण केले. तसंच इतर अधिकाऱ्यांच्या तुलनेत हे सादरीकरण प्रभावी ठरले असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे अजित पवार यांनी जितेंद्र डुडी यांची पाठ थोपटली आणि जाहीरपणे पुण्याच्या जिल्हाधिकारीपदी याल का? अशी विचारणा सुध्दा केली.
दरम्यान, पुण्याचे विद्यमान जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख असून त्यांना पुण्यात येऊन 3 वर्षे पूर्ण झाली आहेत. तसेच आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या होणार असून या बैठकीला 5 जिल्ह्यांचे वरिष्ठ तसेच विविध खात्यांचे अधिकारी उपस्थित होते. थेट उपमुख्यमंत्र्यांनीच कौतुक केल्याने प्रशासनात जितेंद्र डुडी हे पुण्यात जिल्हाधिकारी म्हणून येणार असल्याची चर्चा सर्वत्र रंगत असल्याचे दिसून येत आहे.